मराठा समाजाचा आजचा निश्चय… पुढचं पाऊल…! संपर्क मोहिमेच्या निमित्ताने… भूमिका!
आजचा निश्चय पुढचं पाऊल’ या संकल्पनेतून यापुढे ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास घेऊन समाजाने आपल्या विकासासाठी शिक्षण, स्वयंरोजगार, उदयोग, व्यवसाय, अर्थ, सहकार, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांत दमदारपणे पाऊल टाकले पाहिजे, एकेकाळी सामर्थ्याच्या जोरावर दुर्बलांचे रक्षण करणारा संख्येने मोठा असणारा मराठा समाज आज विद्यमान सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थेमध्ये कोंडीत सापडला आहे. समाजात कालानुरूप बदल स्वीकारत विज्ञानाभिमुख विचारसरणीचा प्रसार आधुनिक दृष्टिकोन स्वीकारत समाजात स्वाभिमान, स्वावलंबन, जागृती या तीनही गोष्टींचा आधार घेत समाजाने प्रगतिपथावर घोडदौड करणे आवश्यक आहे.
प्रगत समाज पुढच्या पाच पंचवीस वर्षांचा विचार करतो तर, जगण्याची लढाई लढणारा समाज रोजच्या दिवसाचा विचार करतो. इतिहासात रममाण झालेला समाज मागच्या ३५० वर्षांचा विचार करतो, तर अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजिक संघटना १९८१ साली कै. आमदार, अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे. मराठा समाजाची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, उन्नती व्हावी त्याचबरोबर सामाजिक दबावगट निर्माण व्हावा ही मूलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे. मराठा महासंघ हा कुणत्याही जातीधर्माच्या विरोधात नसून समाजातील दोष कमी करून सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार इ. वर्गाच्या प्रश्नांची दखल घेत आपली वाटचाल करीत आहे. काळाच्या प्रवाहात टिकायचे असेल तर नव्या रणांगणात आपण उतरले पाहिजे.
आज ज्ञानाचा विस्फोट झालेला दिसून येत आहे. प्रत्येक ज्ञानशाखेत नवनवीन माहितीची भर पडत आहे. हे युग विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे आणि स्पर्धेचे आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ज्ञानाची नवी दालने खुली होत आहेत. मोबाईलमुळे ज्ञानाचा व माहितीचा सागर तुमच्या हातात आला आहे. त्यामुळे आम्हाला कोणी ज्ञानाचे दरवाजे बंद ठेवले हे म्हणायला कारण नाही. या परिवर्तनाबरोबर आपण पुढे गेलो, तरच आपला टिकाव लागणार आहे. त्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. एकेकाळी गावगाड्यातील अर्थव्यवस्थेचा मूळ आधार असणारा समाज आर्थिक बदलाच्या आव्हानांना पुरेशा ताकदीने सामोरा न गेल्याने किंवा बदलत्या स्थितीत मागे पडल्याने आता त्याला रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिकतेकडे वळणे गरजेचे आहे.
आजच्या युगात सर्वार्थाने आपले स्थान कोठे आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी समाजाने स्थितीवादी होण्यापेक्षा गतिवादी झाले पाहिजे. त्यासाठी समाजाने काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत, समाज
लाखोंच्या संख्येने एकत्र येतो. या गदींचे रूपांतर शक्तीत झाले पाहिजे. ही शक्ती मागणारी नव्हे तर देणारी झालो पाहिजे, संघर्ष असेल तेंव्हा तो केला पाहिजे, तो अन्यायाच्या निवारणासाठी असला पाहिजे. मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या मराठ्यांनी गतकाळातल्या वैभवाला गवसणी घालण्यासाठी सदैव तत्पर असावे ही अभियानामागची भूमिका, आजकाल वाचण्याची सवय कमी झाल्याने या पुस्तिकेत महत्वाचे मुद्दे Bullet Point स्वरुपात तसेच विस्तृत माहितीसाठी QR Code किंवा लिंक मार्फत व्हिडिओ उपलब्ध करून दिले आहेत. त्यात वेळोवेळी नवनवीन माहिती व व्हिडिओ दर महिन्याला समाविष्ट करणार असल्याने या पुस्तिकेमध्ये दिलेल्या कडे QR व LINK च्या माध्यमातून आपणाशी डिजिटल माध्यमातून नेहमीच संपर्कात राहू धन्यवाद